पालघर जिल्ह्यातील अल्पपरिचीत गडकिल्ले

1.आशेरी गड  ( Aasheri Fort )



 किल्ल्याची ऊंची :  1680

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर

जिल्हा : पालघर

श्रेणी : मध्यम

पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात 'दादा' वाटावा असा हा अशेरीगड किल्ला आहे. याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.


आशेरीगड


इतिहास :

आशेरीगड  हा शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणत: ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली. पेशव्यांनी १७३७ च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला. १८१८ नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला.

पाहण्याची ठिकाणे :

आशेरी गडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा घरा भोवती साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणार्‍या वार्‍याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. मात्र इथे आत व बाहेर पहारेकर्‍यांना झोपण्यासाठी दगडी पलंग ('बर्थ') केलेले आहेत.


गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी भेग व पुढे एक बांधीव बुरूज दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा :


गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणार्‍या एस टी बसने किंवा या महामार्गावरून धावणार्‍या खाजगी वाहनाने निघून 'मस्तान नाका' या ठिकाणापासून सुमारे १० - ११ किमी वर असणार्‍या 'खडकोना' गावाच्या स्टॉपला उतरायचे. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामार्गावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. बैलगाडीची वाट एका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवतात. विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून, गावकर्‍यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायचं. वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही. साधारणत: खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतॊ. इथपर्यंत वाट सोपी, पण चढणीची आहे. खिंडीत थोड्या वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटे उघडे देऊळ आहे. 
         खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं. इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातला की आपण दरवाजाच्या खाली येतो. इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेशमूर्ती आहे. दरवाजा सुरुंगाने फोडलेला आहे. इथे मात्र वर चढताना काळजी घेणे आवश्यक आहे. प्रस्तर वेडेवाकडे असल्याने अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने चढाइ करणे योग्य शक्यतो पाठीवरचे सामान उतरवूनच चढावे. इथून प्रस्तरारोहणाची हौस भागवून वर चढले की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत. वाटेत खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यावरूनच दुतर्फा खांद्यापर्यंत उंच झुडूपांतून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला थोडे खाली ,खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिने खाली गेल्यावर पाण्याची आणखी तीन टाकी आहेत. या टाक्यातील पाणी अतिशय सुंदर आल्हाददायक आहे. जवळच खडकात एक गुहा देखील आहे.
राहण्याची सोय :

१० ते १२ माणसे गडावरील गुहेत व बाहेरच्या बांधीव कट्‌ट्यांवर राहू शकतात. परंतु उंदरांपासून सामानाची काळजी घ्यावी.

जेवणाची सोय :

आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय :

गडावरील टाक्यांत पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.




जाण्यासाठी लागणारा वेळ :

'खडकोना' गावापासून ३ तास.

सूचना :

पावसाळ्यात प्रस्तरारोहण धोक्याचे ठरू शकते.


2. कोहोज गड  (Kohoj Fort )

 किल्ल्याची ऊंची :  3200

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पालघर

जिल्हा : पालघर

श्रेणी : मध्यम

पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या खोर्यात गोतारा, कामणदुर्ग, कोहोज असे काहीसे अल्पपरिचित किल्ले आहेत. यापैकी वाडा - पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज’ हा प्रमुख किल्ला वाड्यापासून अवघ्या १० ते ११ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. ‘कोहोज’ किल्ल्यावरील माणसाच्या आकाराच्या निसर्ग निर्मित सुळक्यामुळे या भागातून प्रवास करताना हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. मुंबई - ठाण्याहून जवळ असूनही या भागातल्या किल्ल्यांवर डोंगर भटक्यांचा वावर तसा कमीच आहे. त्यामूळे किल्ल्यांवर जाणार्या वाटा मोडलेल्या आहेत. तसेच अनेक ढोरवाटांमुळे याभागात वाट चूकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या किल्ल्यांवर जातांना गावातून वाटाड्या घेऊनच जावे.

इतिहास :
गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड सातवाहनकालीन असावा . १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरूज चढवले. छ. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता.

पाहण्याची ठिकाणे :

नाणे मार्गे किल्ला चढाईला सुरुवात केल्यावर साधारण एक तासात आपण कारवीच्या दाट झाडीतून छोट्या पठारावर पोहोचतो. पुढे ठळक पाऊलवाट वाट कातळ टप्प्यापाशी येते. कातळटप्पा चढून गेल्यावर आपण मोठ्या पठारावर पोहोचतो. पठारावर पायवाटेच्या उजव्या बाजूला सात पाण्याची टाकी कातळात कोरलेली आहेत. पुढे गेल्यावर शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर देवीची मुर्ती आहे. या मंदिराला कोहोजाई माता मंदिर या नावानेही गावकरी ओळखतात. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत. जवळच एका झाडाखाली काही शेंदुर लावलेले दगड व समाध्या ठेवलेल्या आहेत. याठिकाणी वाघोट्याहून येणारी पायवाट मिळते. पुढे गडमाथ्याकडे चढाई करतांना उध्वस्त प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. त्याच्या डाव्या बाजूला चिलखती बुरुज आहे. बुरुजाच्या आत मारुतीची मुर्ती आहे. बुरुजाच्या पुढे तीन खांब टाकी आहेत. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे चढत जातांना पायवाटेच्या उजवीकडे पाण्याची दोन टाकी आहेत. पुढे चढत गेल्यावर किल्ल्यावरील निसर्ग निर्मित शिल्प (माणसाच्या आकाराचा सारखा भासणारा दगडी सुळका) आहे. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो. इथून थोडे पुढे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. येथून खालचा (वाडा - मनोर) रस्ता छान दिसतो. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

पोहोचण्याच्या वाटा :

किल्ल्याच्या पश्चिमेला नाणे गाव आहे आणि पूर्वेला वाघोटे गाव आहे . दोन्ही गावातून गडावर जाण्याच्या वाटा आहेत.

वाघोटे मार्गे जाण्यासाठी :-
१) मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (एन.एच.८) मुंबई पासून ९० किलोमीटरवर मनोर गाव आहे. येथून वाड्याला जाणारा फाटा फूटतो. या मनोर - वाडा रस्त्यावर मनोर पासून १३ कि.मीवर "वाघोटे" हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून ठळक पायवाट धरणाच्या तलावाच्या भितींवरुन किल्ल्यावर जाते.

२) कल्याण - भिवंडी - वाघोटे ( कोहोजच्या पायथ्याचे गाव) हे अंतर ६३ किलोमीटर आहे. गावातून ठळक पायवाट धरणाच्या तलावाच्या भितींवरुन किल्ल्यावर जाते.

नाणे मार्गे जाण्यासाठी :-

३) मुंबई - अहमदाबाद महामार्गावर  मुंबई पासून ९० किलोमीटरवर मनोर गाव आहे. येथून वाड्याला जाणारा फाटा फूटतो. या मनोर - वाडा रस्त्यावर मनोर पासून ३ किलोमीटर अंतरावर उजवीकडे "नाणे" गावाला जाणारा फ़ाटा आहे . नाणे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून पायवाट किल्ल्यावर जाते.

४) कल्याण - भिवंडी - कुडूस - नाणे हे अंतर १०४ किलोमीटर आहे. नाणे गावातून पायवाट किल्ल्यावर जाते.

राहाण्याची सोय :

गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :

जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :

पिण्याचे पाणी गडावरील खांब टाक्यात मार्चपर्यंत असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाघोटे मार्गे ३ तास लागतात. नाणे मार्गे ३ तास लागतात.
 

Comments